मुक्ताईनगर : शहरातील भुसावळ रोड लगत असलेल्या दगडी खदानीत पडून एका ४९ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. किशोर गोपाळ मराठे (वय ४९ वर्षे) असे मयत इसमाचे नाव आहे. पत्नी, दोन मुलं व एक मुलगी यांच्यासह तो मुक्ताईनगर शहरात वास्तव्यास होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर मराठे यांच्या पत्नीने एकविरा फायनान्स चे कर्ज घेतले होते. कर्ज कसे फेडायचे याची चिंता नेहमी किशोर मराठे यांना असायची. याच चिंतेमध्ये व विचारात असताना किशोर गोपाळ मराठे हे भुसावळ रोड लगत असलेल्या दगडी खदानीत पडले व त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान या संदर्भात त्यांचा लहान भाऊ श्याम मराठे यांना सकाळी ९ वाजता भ्रमणध्वनी द्वारा माहिती मिळाली तेव्हा त्यांनी खदानीत जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी लोकांची गर्दी झालेली होती व त्यांच्या भावाच्या चपला त्या ठिकाणी दिसून आल्या दरम्यान किशोर मराठे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. मयत किशोर यांचा लहान भाऊ श्याम गोपाळ मराठे (वय ४२ वर्षे, रा. श्रीराम नगर, भिलवाडी मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.
दगडी खदानीत पडून 49 वर्षीय इसमाचा मृत्यू, मुक्ताईनगर येथील घटना!
