मलकापूर ( दिपक इटणारे ):- परंपरा, संस्कृती आणि आनंदाचा संगम म्हणजे दहीहंडी उत्सव. प्रत्येक वर्षी गोकुळाष्टमीला हा सोहळा साजरा होतोच; पण शालेय पातळीवर विद्यार्थ्यांनी उत्साहाने यात सहभाग घेतल्यास त्याला वेगळेच रंग भरतात. असाच रंगतदार सोहळा यंदा नूतन इंग्लिश स्कूल, मलकापूरमध्ये पाहायला मिळाला. शैक्षणिक उपक्रमांसह सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या नूतन इंग्लिश स्कूलमध्ये यंदा दहीहंडी उत्सव भव्यदिव्य साजरा करण्यात आला. जयघोषांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत सजलेले विद्यार्थी आणि रंगीबेरंगी सजावटीने शाळेचा परिसर उत्साहाने गजबजून गेला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य सुरेश खर्चे सर व उपप्राचार्य प्रा. अमोल चोपडे सर यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गवळणी, भजन गायन आणि श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित प्रात्यक्षिके सादर केली. रंगीबेरंगी फुलांनी सजविलेली दहीहंडी फोडण्याचा थरार विद्यार्थ्यांनी अनुभवला. अगदी लहान बालगोविंदांच्या सहभागामुळे वातावरण आणखी उत्साहवर्धक झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शेवटी विजयी गटाला बक्षिसे प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनुराधा इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत खर्चे यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.